महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपद न दिल्यामुळे नाराजीनाट्य सुरु आहे. यावरुन आंदोलन केल्यामुळे भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत मांडले आहे
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झालेला एकतर्फी विजय हा महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष नाराज असून महायुतीमध्ये देखील पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच व नाराजीनाट्य सुरु आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आली आहे. यावरुन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधून नेत्यांचे येणे वाढले असल्यावर भाष्य केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “संभाजी नगर येथील उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांचा काल प्रवेश झाला. आज 15 सरपंच आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत. प्रमुख नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लोटांगण घालत आहेत. दोन-तीन वर्षात उद्धव ठाकरेंना नगरपालिका, जिल्हा परिषद लढावायला देखील माणसं मिळणार नाहीत. आजचा पक्ष प्रवेश भाजपला उभारी देणारा असेल,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “भाजपचे मिशन पहिल्या पासून सुरु होतं. लोकसभेत आम्ही महाविजय मिळवला. विधानसभेत महाविजय मिळवला. 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लढणार आहोत. विधानसभेत चांगलं यश मिळालं, तसच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळेल. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी युती केली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या विचारांशी संगनमत केलं. मतांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धव ठाकरेंच्या परभणी आणि नाशिकमधील रॅलीत पाकिस्तानी ध्वज फडकताना कार्यकर्त्यांनी बघितले. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. म्हणून हे पक्ष प्रवेश सुरु आहेत,” असे स्पष्ट मत भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

