वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्या नव्या ट्रम्प सरकारमध्ये भारताला प्राधान्य मिळेल, हे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्पष्ट झाले. ट्रम्प यांनी सोमवारी (20 जानेवारी 2025) दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (21 जानेवारी 2025) त्यांच्या परराष्ट्र धोरणात भारताला प्राधान्य देण्यात आले. ट्रम्प सरकारचे नवे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी क्वाड बैठकीत भाग घेतला आणि त्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी त्यांचे पहिले द्विपक्षीय संभाषणही केले. अमेरिकेच्या नवीन परराष्ट्रमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे क्वाड बैठकीचे यजमानपद. यानंतर त्यांची पहिली द्विपक्षीय चर्चा भारतीय परराष्ट्रमंत्र्यांशी झाली.
क्वाड ही चार देशांची संघटना आहे. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या संघटनेच्या माध्यमातून हे चार देश परस्पर सहकार्याला चालना देत आहेत. शिवाय, हाच गट चीनच्या प्रत्येक हालचालीला आव्हान देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात हा पुढाकार घेण्यात आला होता आणि आता त्यांच्या दुस-या कार्यकाळातही ट्रम्प यांनी या गटाच्या बैठकीतून आपली मनोवृत्ती व्यक्त केली आहे.

