जालना जिल्हा बँक भरतीचा सावळागोंधळ! महिला उमेदवारांनाही २०० किलोमीटर दूर परीक्षा केंद्रे; बेरोजगारांमध्ये संताप
बदनापूर (प्रतिनिधी) :
जालना जिल्ह्यात एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असताना, दुसरीकडे जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी बँक) कर्मचारी भरती प्रक्रियेने बेरोजगार उमेदवारांच्या अडचणीत भर घातली आहे. भरती परीक्षेसाठी जालना जिल्ह्यातील उमेदवारांना तब्बल १५० ते २०० किलोमीटर अंतरावरील नाशिक, जळगाव, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, महिला उमेदवारांनाही दूरच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे मिळाल्याने त्यांच्या प्रवासाचा, सुरक्षिततेचा आणि आर्थिक खर्चाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महिला उमेदवारांसमोर प्रवासाचे मोठे आव्हानग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट आहे. अशा परिस्थितीत परीक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करणे, प्रवासाची व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार मुक्कामाची सोय करणे आणि त्यासाठी अतिरिक्त खर्च करणे उमेदवारांसाठी कठीण ठरत आहे.विशेषतः महिला उमेदवारांना दूरच्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढण्याबरोबरच सुरक्षिततेचा आणि वेळेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ऐन परीक्षेच्या काळात एवढ्या लांबचा प्रवास कसा करायचा, असा प्रश्न अनेक महिला उमेदवार आणि त्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.परीक्षा शुल्कासह प्रवासाचा अतिरिक्त आर्थिक भारभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे. त्यानंतर आता दूरच्या परीक्षा केंद्रांमुळे प्रवास आणि निवासासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिस्थितीनुसार प्रत्येक उमेदवाराला ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक खर्च येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या तरुणांसाठी हा अतिरिक्त भार ठरत आहे.जालना शहरासह छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात परीक्षा केंद्रांची उपलब्धता असताना स्थानिक उमेदवारांना इतक्या दूरच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे का देण्यात आली, असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.परीक्षा केंद्रे बदलण्याची उमेदवारांची मागणीजिल्हा बँक प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन दूरच्या परीक्षा केंद्रांमुळे निर्माण झालेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. जालना जिल्ह्यातील तसेच महिला उमेदवारांना शक्यतो जालना आणि लगतच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध करून द्यावीत. ज्यांना १५० ते २०० किलोमीटर अंतरावरील केंद्रे देण्यात आली आहेत, त्यांची केंद्रे बदलण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारापरीक्षा केंद्रांच्या नियोजनामुळे उमेदवारांना होणारा त्रास लक्षात घेऊन बँक व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. विशेषतः महिला उमेदवारांची सुरक्षितता, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती आणि प्रवासातील अडचणींचा विचार करून परीक्षा केंद्रांबाबत फेरविचार करावा, अशी मागणी बेरोजगार तरुणांकडून केली जात आहे. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बेरोजगार उमेदवारांनी दिला आहे.