महाराष्ट्र

तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

Writing

पैठण / स्वाती वाघ (तालुका प्रतिनिधी )
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र तुळजापूर येथून तुळजाभवानी देवीची पवित्र ज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासात काळाने घाला घातला. बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारात भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे गोळेगाव, जाफराबादवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
पिंपळगाव पांढरी शिवारात अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफराबादवाडी येथील भाविक दरवर्षीप्रमाणे तुळजाभवानी देवीची पवित्र ज्योत घेऊन पायी गावाकडे परतत होते. पदयात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच आवश्यक साहित्याच्या वाहतुकीसाठी काही तरुण दुचाकीवरून त्यांच्यासोबत होते. दरम्यान, महामार्गावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाले.
एकाचा घटनास्थळी, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात अक्षय बिजलसिंग राजपूत (वय २८, रा. जाफराबादवाडी, व्यवसाय गॅरेज, कातशेवरी फाटा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अमोल औटे आणि गोरख म्हसकर (दोघेही रा. गोळेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, शुभम आघाने (वय २०, रा. चिमणापूर) हा देवीची ज्योत हातात घेऊन चालणारा तरुण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेली
अपघातानंतर कंटेनरखाली अडकलेली दुचाकी चालकाने न थांबवता सुमारे पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची माहिती आहे. चित्तेपिंपळगाव पुलाजवळ दुचाकी खाली पडल्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला.
करमाड पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत करण्यात आली. फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासात घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. तीन तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button