दिवाळी खरेदीस निघालेल्या तिघा युवकांचा अपघाती मृत्यू; शेवगाव तालुका हळहळला

शेवगाव, दि. 8 (प्रतिनिधी) – दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी शेवगावकडे निघालेल्या खानापूर येथील तीन युवकांचा दुचाकी-ट्रकच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण शिवारात शुक्रवारी घडली.
मृतांची नावे –
- अमर रविंद्र जगधने (वय 17 वर्षे)
- ओंकार भाऊसाहेब जगधने (वय 19 वर्षे)
- रोहित रमेश धनुरे (वय 27 वर्षे, सर्व रा. खानापूर, ता. शेवगाव)
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील तिघे युवक एमएच 16 डीवाय 3899 या दुचाकीवरून शेवगावकडे जात असताना, राहुरी येथील कारखान्यात ऊस खाली करून पैठणकडे निघालेल्या एमएच 15 एचएच 3465 क्रमांकाच्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. या भीषण धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तिन्ही मृतदेहांवर शनिवारी (दि. 7) खानापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सणासुदीच्या काळात एकाच गावातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खानापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


